वाक्यप्रचार :

१. आकाशाला गवसणी घालणे – अशक्य गोष्ट शक्य करण्याचा प्रयत्न करणे.

२. हाताला काहीही न लागणे – काहीच फायदा न होणे.

 ३. गांगरून जाणे – गोंधळून जाणे.

 ४. मेळ न बसणे – खर्च न जुळणे.

 ५. नाव न काढणे – पुन्हा काहीही न बोलणे.

टीपा :

१. ब्रह्मवीणा – तंबोऱ्याच्या आकाराचे एक तंतुवाद्य.

२. जे पिंडी ते ब्रह्मांडी – जे जे एका वस्तूत (पिंडीत) ते ते सकल विश्वात (ब्रह्मांडी) असते.

३. विठोबा – पंढरपूरचा विठ्ठल, संतांचा मायबाप.

४. मॉन्टेस्क – एक फ्रेन्च ग्रंथकार.

५. तुकोबा – महाराष्ट्रातील प्रसिद्ध विठ्ठलभक्त. संत तुकाराम म्हणून भारतात प्रसिद्ध

प्रश्न :

(अ) खालील विधाने कोणी, कोणास म्हटली आहेत ते लिहा :

१. “अरे खुळ्या, सगळ्या पृथ्वीला नेसविण्यापेक्षा तूच आपल्या पायांत जोडे घाल म्हणजे झाले”
उत्तर : हे वाक्य बापाने आपल्या मुलाला म्हटले.

२. ‘जे पिंडी ते ब्रह्मांडी’ ह्या सूत्राप्रमाणे नारदांनी पृथ्वी प्रदक्षिणा पुरी केली आहे, असे माझे मत आहे.
 उत्तर : हे वाक्य विष्णूने पृथ्वीप्रदक्षिणा घालून परत आलेल्या देवांना म्हटले.

३. “तीस कोटी लोकांची शरीरे खादीमय झाली पाहिजेत. सहा कोटी कुटुंड सहा कोटी चरखे दाखल झाले पाहिजेत.”
उत्तर : हे वाक्य लेखक आचार्य विनोबा भावे यांनी स्व-रूपाविषयी बोलताना स्वतःलाच म्हटले आहे.

(आ) खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यांत उत्तरे लिहा:

१. आम्हाला कोणत्या गोष्टीसाठी वेळ मिळत नाही ?
उत्तर : आपल्या मनातला क्रोध जिंकण्याला आम्हाला वेळ मिळत नाही.

२.  आम्हाला कोणती सवय लागत चालली आहे ?
उत्तर : कोणत्याही प्रश्नाचा आतून विचार न करता बाहेरून विचार करण्याची आम्हाला सवय लागत चालली आहे.

३. प्रचाराचे एकमात्र साधन कोणते?
उत्तर : आचार हेच प्रचाराचे एकमात्र साधन आहे.

४. विश्वाचे कोडे सोडविण्याची खटपट व्यर्थ का आहे  ?
उत्तर: माणूस स्वतःला वगळून ही खटपट करतो म्हणून विश्वाचे कोडे सोडविण्याची खटपट व्यर्थ आहे.

५. खादीचे स्व-रूप कोणते   ?
उत्तर : ‘माझ्या शरीरावर संपूर्ण खादी असली पाहिजे व मी एक तास रोज चरखा कातला पाहिजे ‘ हे खादीचे स्व-रूप आहे.

६. अहिंसेचे स्व-रूप कोणते  ?
उत्तर: ‘माझे अंतःकरण प्रेमाने भरलेले पाहिजे व माझ्या वाणीवर माझा ताबा पाहिजे ‘ हे अहिंसेचे स्व-रूप आहे.

७. हरएक प्रश्नाची किती व कोणती अंगे असतात ? 
उत्तर: हरएक प्रश्नाची स्वरूप-दर्शन आणि विश्वरूप-दर्शन अशी दोन अंगे असतात.

८. माणसाची कोणत्या वचनातून सुटका नाही  ?
उत्तर : ‘औट हात तुझी जागा’ या तुकोबांच्या वचनातून माणसाची सुटका नाही.

९. विश्वरूपदर्शनाची हौस कोणाला लागली होती  ?
उत्तर : विश्वरूपदर्शनाची हौस अर्जुनाला लागली होती.

१०. विश्वरूप-दर्शनाचे उत्तम साधन कोणते  ?
उत्तर: स्वरूप-दर्शन हेच विश्वरूप-दर्शनाचे उत्तम साधन आहे.

(इ) खालील प्रश्नांची प्रत्येकी दोन ते तीन वाक्यांत उत्तरे लिहा:

१. नारदांनी पृथ्वीप्रदक्षिणा कशी पुरी केली  ?
उत्तर:  सर्व देव पृथ्वीप्रदक्षिणा घालण्यासाठी घाईघाईत निघाले. पहिला देव धापा टाकीत परत येत आहे असे पाहताच नारदांनी स्वतःभोवती गिरकी मारून विष्णूला नमस्कार घातला.

२. दहाजणांनी कोणता ठराव पास केला  ?
उत्तर : दहा माणसे यात्रेला निघाली. जंगलातली वाट धोक्याची असल्यामुळे सगळ्या माणसांनी एकत्र चालावे असे ठरवून एकाने माणसे मोजून पाहिली, ती नऊच भरली. दुसऱ्याने मोजून पाहिली तरी नऊच. शेवटी ‘दहावा माणूस हरवला’ असा दहाजणांनी एकमताने ठराव पास केला.

३. मुद्याची गोष्ट लक्षात न घेतल्यामुळे काय होते  ?
उत्तर : मुद्याची गोष्ट लक्षात न घेतल्यामुळे आमचे सारे चरित्र म्हणजे विरोधालंकाराचे उदाहरण बनते. आम्ही मौनाच्या प्रचारासाठी व्याख्याने देतो आणि प्रचार झाला नाही म्हणजे विचारात पडतो.

(ई) खालील प्रश्नांची प्रत्येकी चार ते सहा वाक्यांत उत्तरे लिहा :

१. ‘श्रीमंताच्या खुळ्या पोरासारखी आपली स्थिती झाली आहे, ‘ असे लेखकाने का म्हटले आहे ?
उत्तर :श्रीमंताच्या त्या खुळ्या पोराप्रमाणे आकाशाला गवसणी घालणाऱ्या मोठ्या मोठ्या कल्पना आपल्याला सुचतात. पण साधे, सरळ, सोपे इलाज सुचत नाहीत. कोणत्याही प्रश्नाचा आतून विचार न करता बाहेरून विचार करण्याची आम्हाला सवयच लागत चालली आहे. म्हणून लेखक म्हणतो की श्रीमंताच्या त्या खुळ्या पोरासारखी आपली स्थिती झाली आहे.

२. विनोबाजींच्या मते माणसाने स्व-रूप का पहावे  ?
उत्तर: स्वरूप-दर्शन माणसाच्या हातचे आहे. माणसाने कितीही भारतीयत्व मिरविले तरी त्याची अखेरची स्थिती ‘औट हात तुझी जागा’ ह्या तुकारामाच्या वचनाप्रमाणे आहे. भगवंतांनी अर्जुनासारख्या एकमेव ‘नरा’ला दिव्यदृष्टी दिली होती. तरीही विश्वरूप – दर्शन त्याच्या पचनी पडले नाही. इतका सगळा योग असूनही अर्जुनाची ही दशा. मग सामान्य माणसाची काय कथा? शिवाय स्वरूप-दर्शन हेच विश्वरूप-दर्शनाचे सर्वोत्तम साधन आहे. म्हणून विनोबाजीच्या मतानुसार स्व-रूप पाहावे.

३. वेदांतातल्या त्या गोष्टीतील माणसे मोजण्याच्या घोटाळ्यासारखा आजही घोटाळा चालतो, असे लेखक का म्हणतो ?
उत्तर: “काम करायला माणसे नाहीत” असे म्हणणारी माणसे आज सर्वत्र आढळतात. प्रत्येकजण स्वतःला मोजण्याचे सोडून देतो व हिशेब करायला बसतो. त्यामुळे कामाचा काहीच मेळ बसत नाही. स्वतःला वगळून विश्वाचे कोडे सोडविण्याची खटपट चालते, पण ती व्यर्थ ठरते. ह्या खटपटीतून हाताला काहीच लागत नाही. माणूस गांगरून मात्र जातो. म्हणूनच लेखक म्हणतो की वेदांतातील त्या गोष्टीतील माणसे मोजण्याच्या घोटाळ्यासारखा आजही घोटाळा चालतो.

भाषाभास :

विशेषण विचार

विशेषण – नामा बदल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण अस म्हणतात.

उदा. चांगली मुले

काळा कुत्रा

पाच टोप्या

विशेषण – चांगली, काळा, पाच

विशेष्य – पिशवी, कुत्रा, टोप्या

विशेषणाचे प्रकार

१. गुणवाचक विशेषण

२. संख्यावाचक विशेषण

३. सार्वनामिक विशेषण

१. गुणवाचक विशेषण : नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष माहिती दाखविणाऱ्या विशेषणाला “गुणवाचक विशेषण” असे म्हणतात.

उदा. हिरवे रान

शुभ्र ससा

निळे आकाश

2. संख्या विशेषण : ज्या विशेषणांच्या योगाने नामाची संख्या दाखविली जाते त्यास संख्या विशेषण असे म्हणतात.

उदा. दहा मुले

तेरा भाषा

एक तास

पन्नास रुपये

३. सार्वनामिक विशेषण : सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात.

उदा. हे झाड

ती मुलगी

तो पक्षी

वरील वाक्यांत माझी, तो. जी ही सर्वनामे अनुक्रमे झाड, मुलगी, पक्षी या नामांची विशेष माहिती सांगतात. म्हणून ती सार्वनामिक विशेषणे बनली आहेत.